गृहमंत्र्याच्या नावे ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची होणार चौकशी

सोलापुर |  लॉकडाऊन काळात नियम तोडणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका ज्वेलर्स दुकान मालकाने पोलिसांवर गंभीर आरोप केले  होते.

बार्शी शहरातील चांदमल ज्वेलर्सचे मालक अमृतराव गुगळे यांनी बार्शी पोलिस  स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुगळे म्हणाले, ‘पोलिसांनी दुपारी दोनच्या सुमारास बंद असलेल्या दुकानात जबरदस्तीने शिरून मला दमदाटी करून पोलिस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्यांनी मला बसवून ठेवले.’

‘त्यानंतर पोलिस निरिक्षक गिरीगोसावींनी कारवाई टाळण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. मी नकार दिला असता ते म्हणाले आम्हाला गृहमंत्र्यांपर्यंत हप्ते पोहोचवावे लागतात. तुम्ही पैसे नाही दिले तर अनेक गुन्ह्यामध्ये अडकवू. आम्ही तुमचं दुकान सील करणार आहे. त्यानंतर पोलिसांनी माझं दुकान सील केले.’

पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार समोर आणला होता. सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि अनेकांना माल कमावण्याची संधी मिळाली. असं ट्विट राजू शेट्टींनी केलं होतं.

या प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्यांनी प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना पोलिस निरिक्षक गिरीगोसावी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिले असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

आता पुन्हा एकदा पोलिस निरिक्षकाने गृहमंत्र्यांच्या नावाने दुकानदाराला खंडणीची मागणी केल्यामुळे या प्रकरणात चौकशीत पुढे काय निष्पन्न होतंय. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
टाटा पुन्हा आले मदतीला धावून; ४० हजार बरोजगारांना देणार नोकऱ्या
मी देशासाठी मरतोय, पण माझ्या पत्नीला उपचार मिळेनात; BSF जवान ढसाढसा रडला
धक्कादायक! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ जणांचा मृत्यू

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.