मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य जीएसटी विभागाने झवेरी बाजार परिसरातील एका सराफ व्यापाऱ्याच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९.७८ कोटी रुपयांची रोकड आणि १९ किलो चांदी जप्त केली आहे. ही रोकड आणि चांदी कार्यालयातील भिंतीत लपवण्यात आली होती.(19 kg silver bricks and cash of Rs 10 crore found in the wall)
जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान कार्यालयातील भिंतीत ९.७८ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १९ किलो चांदीच्या विटा आढळल्या आहेत. झवेरी बाजार(Zaveri Market) परिसरातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईसंदर्भात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीच्या गेल्या तीन वर्षांच्या उलाढालीत काही संशयास्पद नोंदी आढळल्या होत्या. २०१९-२० या वर्षी मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची २२ कोटी रुपयांची उलाढाल होती. पण २०२१-२२ या वर्षी ती उलाढाल १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात राज्य जीएसटी विभागाचा संशय वाढला होता.
त्यानंतर आज राज्य जीएसटी विभागाने मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीच्या झवेरी बाजार परिसरातील कार्यालयावर कारवाई केली आहे. राज्य जीएसटी विभागाने ही जागा सील केली असून, प्राप्तिकर विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या रोख रकमेबद्दल कोणतीही माहिती नव्हती, अशी प्रतिक्रिया मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीच्या मालकांनी दिली आहे.
२० एप्रिलच्या संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ६ तास ही कारवाई चालली होती. या कारवाईनंतर कंपनीच्या मालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात कंपनीच्या मालकांना राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जीएसटी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य जीएसटी विभागाने याविरोधात मोहीम उभारली आहे. या मोहिमेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील कंपन्यांमध्ये राज्य जीएसटी विभागाकडून छापे टाकण्यात येत आहेत. या कारवाईत दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
यापुढे कुणी शिवसेनेच्या नादाला लागाल तर आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून या; शिवसेनेची थेट धमकी
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार






