नाथाभाऊंनी भाजपाला पाडले खिंडार! ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | अलीकडेच भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी भाजपला जबर दणका दिला आहे. भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याचबरोबर भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची वाट धरू लागले आहेत.

यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक आजी-माजी नगसेवकांचा समावेश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी दिलेला इशारा अतिशय सूचक होता. मला जितकं छळाल, तितकं भाजपचं नुकसान होईल. माझा छळ भाजपला महागात पडेल, असा इशारा खडसेंनी भाजपला दिला होता. त्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात भाजपमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत येऊ लागले आहे.

‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच कोणाचंही नाव न घेता भाजपला इशारा दिला आहे. ‘मागे ईडी लागल्यास मी सीडी लावेन असं म्हटलं होतं. परंतु आता माझी प्रत्यक्षात ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचं काम करणार आहे,’ असे खडसे यांनी म्हंटले.

ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असं मी गमतीनं बोललो होतो. राष्ट्रवादीत प्रवेश करताना जयंत पाटील मला म्हणाले होते की, तुमच्या मागे ईडी लागली तर…? तेव्हा मी म्हटलं सीडी लावेन. आता खरंच लागली मागे ईडी. पण सीडी लावण्याचं काम आता बाकी आहे.’

महत्त्वाच्या बातम्या
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
‘१०० हून जास्त खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत’
संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.